पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळामुळे जमिनीचे भाव वाढले आहेत. त्या पार्श्ववभूमीवर, या परिसरातील गावांमध्ये बोगस दस्तनोंदणी होत आहे का, असा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला असता, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे काही प्रकार झाल्याचे सांगितले. शहरालगतचा प्रस्तावित रिंग रोड आणि पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुरंदर तालुक्यातील जमिनींची मागणी वाढली आहे. त्यातच पुरंदर तालुक्यामध्येच विमानतळ होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येथील जागा खरेदी-विक्रीच्या व्यवहारात लक्षणीय वाढ झाली आहे. विमानतळाच्या भूसंपादनाची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर विमानतळासाठी ज्या सात गावांमध्ये विमानतळ होणार आहे, त्यालगतच्या गावांमधील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. या संदर्भात आमदार आशिष देशमुख यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विमानतळ परिसरातील गावांमधील बोगस दस्तनोंदणीच्या प्रकाराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
