पुणे : केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या २०२४च्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुणे महापालिकेचे स्थान उंचावले आहे. यंदा पुणे महापालिकेने देशात आठवा क्रमांक, तर राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. मागील वर्षी महापालिकेला ९ वा क्रमांक मिळाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ सर्वेक्षण सुरू केले आहे. दर वर्षी यामध्ये देशातील विविध शहरे त्यात सहभागी होतात. शहरांमध्ये स्वच्छतेसाठी केले जाणारे प्रयत्न, प्रशासनाकडून राबविले जाणारे प्रकल्प याची पाहणी करून याचे नामांकन ठरविले जाते. स्वच्छ सर्वे क्षण स्पर्धेत सार्वजनिक स्वच्छता,स्वच्छतागृहांची स्थिती, घरोघरी संकलित होणारा कचरा व वस्ती पातळीवर कचऱ्याचे नियोजन, कचऱ्यावरील प्रक्रिया याची प्रत्यक्ष केली जाणारी पाहणी, नागरिकांचा सहभाग, केंद्र शासनाकडून फोनद्वारे नागरिकांकडून घेतला जाणारा अभिप्राय यांसह अनेक निकषांचा विचार केला जातो. यंदा या स्पर्धेत पुणे महापालिकैचे मानाकंन सुधारले आहे. देशात कोरोनाच्या लाटेनंतर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत २०२० साली पुणे महापालिकेला १५ वा क्रमांक मिळाला होता.
