चार महिन्यांत ४३० खाटांचे रुग्णालय उभारण्याचे आव्हान

Share this post

  • वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता कायम राहण्यासाठी प्रशासन कामाला

पुणे: महापालिकेच्या वतीने सुरूकरण्यात येत असलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रद्द होऊ नये, यासाठी पुढील चार महिन्यांत ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. वैद्यकीय महाविद्यालयासारखा महत्त्वाचा प्रकल्प उभारण्याचा संकल्प करताना महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या रुग्णालयाचे नियोजन न केल्याने हे काम रखडले असल्याची कबुली महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गुरुवारी दिली. वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळविताना ४३० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येईल, असे महापालिकेने सांगितल्यानंतर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) महाविद्यालयाला मान्यता दिली होती. मात्र, आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने, तसेच महाविद्यालय प्रशासन आवश्यक त्या नियमांची पूर्तता करीत नसल्याचा ठपका ठेवून गेल्या महिन्यात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने महापालिकेला नोटीस बजाविली होती. वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रद्द का करू नये; तसेच एक कोटी रुपयांचा दंड का ठोठावू नये, अशी विचारणा केली होती. या पार्श्वभूमीवर त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गुरुवारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमखांची बैठक घेतली. याबाबत नवल किशोर राम म्हणाले, ‘चार महिन्यांत ४३० खाटांचे रु्ग्णालय उभारण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. हे आव्हान प्रशासनाने स्वीकारले असून, त्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पाहताना त्यासाठी आवश्यक असलेल्या रुग्णालयाचे नियोजन करण्यात आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेत हे वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात असून, जेथे रुग्णालय उभारण्याचे नियोजन केले आहे. तेथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने अडचणी आहेत. मात्र, त्यावर मात करत २८० खाटांचे रुग्णालय उभारले जाणार आहे.’ कमला नेहरु रुग्णालयाचे बळकटीकरण केले जाणार आहे. तेथेदेखील काही खाटांची संख्या वाढवून त्याचा उपयोग वैद्यकीय महाविद्यालयासाठी केला जाणार आहे. यासाठी सुमारे ७०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून हा निधी राज्य सरकारमार्फत मिळविण्याचा प्रयत्न आहे. निधी उपलब्ध होईपर्यंत महापालिका खर्च करणार असून, यासाठी कर्जदेखील उचलण्याची महापालिकेची तयारी आहे,’ असे नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. यासाठी तीन भागांचे बांधकाम केले जाणार आहे. हे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.

Rohit Rao
Author: Rohit Rao

Leave a Comment

ख़ास ख़बरें

ताजातरीन

marketmystique